About Us
About us
आमचे विषयी
सन २०११ मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्रातही या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचालनासाठी स्थापित आहे, ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत करण्यात आली. याच अभियानाला राज्यभर उमेद नावाने ओळख मिळालेली आहे. आज हे अभियान राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये आणि ३५१ तालुक्यांमध्ये राज्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये पूर्ण ताकदीने राबविले जात आहे, ज्यामुळे समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करण्याचे काम केले जात आहे. हे त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वांवर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून, त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी मिळवण्याच्या दृष्टीने केले जात आहे.
उमेद अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील ७१ लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढणे हा आहे. हे महत्त्वाकांक्षी ध्येय विविध घटकाद्वारे साध्य केले जाते. ज्यामध्ये समुदाय संघटन स्थापन करून गरिबांनी, गरिबांसाठी निर्माण केलेल्या मजबूत समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती करणे असा आहे.
नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्माण करून विविध पथदर्शी प्रकल्प राबवणे आणि स्वयंसेवी, शासकीय तसेच खाजगी संस्थांसोबत भागीदारी वाढवणे या प्रकारचे काम सातत्याने सुरु आहे.
ग्रामीण गरीब महिलांना अभियानामार्फत आणि विविध वित्तीय संस्था व बँकांच्या मदतीने शाश्वत उपजीविकेचे स्रोत उभे करण्यासाठी वेळेवर, किफायतशीर व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा करण्यात येत आहे. उमेद अभियानाने दारिद्र्य निर्मूलनाचा एक समग्र विचार केला आहे, ज्यात समुदाय विकासापासून ते शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे यामध्ये सामाजिक समावेशन अंतर्गत प्रत्येकाला स्थान आणि आवाज मिळणे सुनिश्चित करणे, आर्थिक समावेशन अंतर्गत आर्थिक सहभागासाठी संधी निर्माण करणे, वित्तीय समावेशन अंतर्गत आवश्यक वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे अशा बाबींचा समावेश आहे.
समुदायस्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. सहभागी महिलांना आर्थिक साक्षर करणे, बचतीच्या सवयीतून आर्थिक शिस्त येणे, उद्योजकतेचा विकास होऊन उद्यमी होण्याचा मार्ग सुकर करणे यासारख्या बाबींचा समावेश करून क्षमता विकसित करण्याचे काम अभियानांतर्गत नियमित सुरु आहे.
गरीब कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ ‘कृतीसंगमांच्या’ माध्यमातून मिळू शकेल यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. विविध विभागांच्या योजनांसोबत समन्वय ठेऊन ग्रामीण महिलांना योजनांचा लाभ कसा मिळेल याबाबत यंत्रणा सजगतेने कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करता यावी आणि त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या करिता उमेद अभियानच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय भव्य दिव्य असे महालक्ष्मी सरस – भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले जाते. तसेच , विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा तत्सम प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची आणि शास्वत बाजारपेठ मिळावी यासाठी अभियानाने umedmart.com हा ई कॉमर्स सेवा सुरु केलेली आहे.
गेल्या १२ वर्षांच्या अंमलबजावणीमध्ये उमेद अभियानाचे सकारात्मक परिणाम राज्यभरात दिसून येत आहेत. ग्राम संघ आणि प्रभाग संघांची स्थापना होऊन संस्थात्मक बळकटीकरण होत आहे. महिला सदस्यांच्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा विकास होताना दिसत आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांचे शेती आधारित आणि बिगर शेती आधारित उद्योग व्यवसाय लाखोंच्या संखेने उभा आहेत आणि त्याच गतीने अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे उभे राहत आहेत.
उत्पादक गटांची स्थापना होत आहे आणि महिला शेतकरी कंपन्याही स्थापन होत आहेत. दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य करण्यासाठी सर्व स्तरांवर कालबद्ध नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला लखपती दीदी बनविण्याचे अभियानाचे ध्येय असून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न अभियानाकडून केले जात आहेत.
उमेद हे केवळ एक अभियान नाही तर ते एक आंदोलन आहे, जे खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रात बदल घडवून आणत आहे, समुदायांना सक्षम करत आहे आणि आत्मनिर्भरता व सन्मानाचे भविष्य घडवत आहे.